# गुरु हा संतकुळीचा राजा - Latin: Guru Ha Santakulicha Raja - Collection: अभंग (Abhang) - Source: https://www.amrutvahini.in/abhang/guru-ha-santakulicha-raja - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-09-17 - Tags: अभंग ## अभंग गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा । गुरुवीण देव दुजा । पाहातां नाहीं त्रिलोकीं ॥१॥ गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर । गुरु हा धैर्याचा डोंगर । कदाकाळी डळमळीना ॥२॥ गुरु वैराग्याचें मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु सोडवी तात्त्काळ । गांठ लिंगदेहाची ॥३॥ गुरु हा साधकाशीं साह्य । गुरु हा भक्तालागी माय । गुरु हा कामधेनु गाय । भक्ताघरीं दुभतसे ॥४॥ गुरु घाली ज्ञानाजंन । गुरु दाखवी निज धन । गुरु सौभाग्य देउन । साधुबोध नांदवी ॥५॥ गुरु मुक्तीचें मंडन । गुरु दुष्टाचें दंडन । गुरु पापाचे खंडन । नानापरी वारितसे ॥६॥ काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हाशीं । बापरखुमादेवीवराशी । ध्यान मानसी लागलें ॥७॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt