Skip to content

बाळ सगुण गुणांचें तान्हें गे

BAL SAGUNA GUNANCHE TANHE

1 भाग · 18 ओळी

गवळण

बाळ सगुण गुणांचें तान्हें गे बाळ दिसतें गोजिरवाणें गे
काय सांगतां गाऱ्हाणे गे गोकुळींच्या नारी ध्रु
श्रीरंग माझा वेडा गे याला नाहीं दुसरा जोडा गे
तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळींच्या नारी ॥१॥
पांच वर्षाचें माझें बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे
कां लटिकाची घेतां आळ गे गोकुळींच्या नारी ॥२॥
सांवळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा
तुम्ही मोठ्या ढालगजा गे गोकुळींच्या नारी ॥३॥
तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे आळ घेतां या गोपाळा गे
तुम्ही ठाईच्या वोढाळा गे गोकुळींच्या नारी ॥४॥
तुम्ही लपवूनी याची गोटी गे लागतां गे याचे पाठीं गे
ही एवढीच रीत खोटी गे गोकुळींच्या नारी ॥५॥
तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे आळ घेतां शारंगधरा गे
तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळींच्या नारी ॥६॥
हा ब्रम्हविधीचा जनिता गे तुम्ही याला धरुं पाहतां गे
हा कैसा येईल हातां गे गोकुळींच्या नारी ॥७॥
नामा म्हणे यशोदेशी गे हा तुझा हृषीकेशी गे
किती छळीतो आम्हांसी गे गोकुळींच्या नारी ॥९॥