# बाळ सगुण गुणांचें तान्हें गे - Latin: Bal Saguna Gunanche Tanhe - Collection: गवळणी (Gavlani) - Source: https://www.amrutvahini.in/gavlani/bal-saguna-gunanche-tanhe - Language: Marathi (मराठी), original text, untranslated - Last revised: 2026-09-17 - Tags: गवळणी ## गवळण बाळ सगुण गुणांचें तान्हें गे । बाळ दिसतें गोजिरवाणें गे । काय सांगतां गाऱ्हाणे गे । गोकुळींच्या नारी ॥ध्रु॥ श्रीरंग माझा वेडा गे । याला नाहीं दुसरा जोडा गे । तुम्ही याची संगत सोडा गे । गोकुळींच्या नारी ॥१॥ पांच वर्षाचें माझें बाळ गे । अंगणी माझ्या खेळे गे । कां लटिकाची घेतां आळ गे । गोकुळींच्या नारी ॥२॥ सांवळा गे चिमणा माझा । गवळणीत खेळे राजा । तुम्ही मोठ्या ढालगजा गे । गोकुळींच्या नारी ॥३॥ तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे । आळ घेतां या गोपाळा गे । तुम्ही ठाईच्या वोढाळा गे । गोकुळींच्या नारी ॥४॥ तुम्ही लपवूनी याची गोटी गे । लागतां गे याचे पाठीं गे । ही एवढीच रीत खोटी गे । गोकुळींच्या नारी ॥५॥ तुम्ही लपवूनी याचा भोवरा गे । आळ घेतां शारंगधरा गे । तुम्ही बारा घरच्या बारा गे । गोकुळींच्या नारी ॥६॥ हा ब्रम्हविधीचा जनिता गे । तुम्ही याला धरुं पाहतां गे । हा कैसा येईल हातां गे । गोकुळींच्या नारी ॥७॥ नामा म्हणे यशोदेशी गे । हा तुझा हृषीकेशी गे । किती छळीतो आम्हांसी गे । गोकुळींच्या नारी ॥९॥ --- Reproduced from the source pothi, unaltered. Free to read at https://www.amrutvahini.in. Index of the full archive: https://www.amrutvahini.in/llms.txt