गोंधळ
अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हातीं ।
पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥
गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ अंबे ॥ध्रु०॥
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं ।
द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥
मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक ।
गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनीं नाचे देख ॥३॥